पैसे मिळत नसल्याने दगडू बोंगाणे यांचे निधन
जालना, दि. २० (प्रतिनिधी): ज्ञानराधा मल्टीस्टेट अंबड शाखेचे ठेवीदार दगडू धोंडीबा बोंगाणे यांनी १५ लाख रुपये एफडीच्या स्वरूपात ठेवले होते. त्यांनी अंबड तहसील समोर सुरू असलेल्या आंदोलनात १२० दिवस सक्रीय सहभाग घेतला होता. मात्र, बँकेकडून एक रुपयाही त्यांना मिळाला नाही. न्याय मिळत नसल्याने भ्रमनिराश आणि मानसिक निराशा झालेल्या दगडू बोंगाणे खचून गेले व १६ डिसेंबर २०२४ रोजी त्यांचे निधन झाले.
आयुष्यभर राबराब राबून जमा केलेले कष्टाचे आणि हक्काचे पैसे मिळत नसल्याने ते निराश झाले. गुन्ह्याचा तपासही समाधानकारक होत नसल्याने ते आणखी निराश झाले. ज्ञानराधा मल्टीस्टेटवर गुन्हा दाखल होऊनही, कोर्टातून पैसे मिळवण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न अपयशी ठरले. शासन आणि प्रशासनाचे गांभीर्य नसल्याकारणाने ते भ्रमनिराश होऊन तणाव, शुगर आणि बीपी वाढल्यामुळे त्यांचे निधन झाले. ठेवीदारांचा प्रश्न आहे, शासन आणखी किती बळींची वाट पाहत आहे.
या प्रकरणाविषयी आमदार, खासदार किंवा लोकप्रतिनिधी संसदेत आवाज उठवणार का? बीड मधील ३००० कोटी घोटाळ्याचा आवाज संसदेपर्यंत कुणी पोहोचवणार का? विधानसभेत याचा आवाज कोणी बनणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज आहे. हजारो लोकांचे पैसे अडकल्यामुळे आणि अनेक बळी गेलेल्यामुळे ठेवीदारांना आता प्रश्न पडला आहे की, त्यांच्या बाजूने कोण आवाज उठवणार आहे.