वाल्मिक कराडवर कारवाई करणारच; मोक्का लावणार – फडणवीस
नागपूर, 20 डिसेंबर 2024
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर कारवाई केलीच जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या सगळ्या प्रकरणात दोषी आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात अल्पकालीन चर्चेत बोलत होते. त्यांनी सांगितले की, वाल्मिक कराड यांचा एका गुन्ह्यात सहभाग असून दुसऱ्या गुन्ह्यातील सहभाग तपासला जाईल.
एसपी अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली
मस्साजोग प्रकरणात बीडचे एसपी अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. बीड-मस्साजोगच्या सरपंच हत्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांच्या कार्यावर ठपका ठेवत फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली. त्यामुळे आता बीडला कोणता अधिकारी येतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हिवाळी अधिवेशनात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे हिवाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना आज सभागृहात दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला. तसेच याप्रकरणातील दोषींवर मकोका लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पोलीस अधिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे त्यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बीडला कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.