बारामतीमध्ये युवकाचा कोयत्याने खून: शहरात भीतीचं वातावरण
बारामती: शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी एका महाविद्यालयात कोयत्याने वार करून विद्यार्थ्याचा खून करण्यात आल्यानंतर आता बारामतीतील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या रस्त्यावर २३ वर्षीय युवकाचा कोयत्याने निघृण वार करत खून करण्यात आला आहे. या प्रकरणाने बारामती पुन्हा हादरली आहे.
रात्री साडेदहाच्या सुमारास प्रगतीनगर परिसरातील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद कॉलेज रस्त्यावर अनिकेत सदाशिव गजाकस या युवकावर कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला आहे. अनिकेत गजाकस याचा मुलीशी बोलण्याच्या कारणावरून खून झाल्याचा संशय आहे. अभिषेक सदाशिव गजाकस यांच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक गजानन ठेके करत आहेत.
या प्रकरणात नंदकिशोर पंजाबराव अंभोरे, महेश नंदकुमार खंडाळे, आणि संग्राम खंडाळे या आरोपींच्या नावांचा उल्लेख आहे. पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
गेल्या सहा महिन्यांत बारामतीमध्ये घडलेला हा तिसरा खून आहे. सप्टेंबर महिन्यात टीसी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा खून झाला होता. त्यामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे की, जसे बीड येथील सरपंचाच्या खूनप्रकरणात विधानसभेत चर्चा झाली तशी बारामतीतील घटनांवरही आक्रमक भूमिका घेतली जाईल का? राज्यातील होणाऱ्या विविध घटनांवरही तितक्याच आक्रमकतेने आवाज उठवला जाईल का, असा प्रश्न संतप्त जनतेकडून विचारला जात आहे.