शरद पवार हे २१ तारखेला सकाळी मस्साजोग गावाला भेट देणार आहेत. २० तारखेला ते छत्रपती संभाजीनगर येथे मुक्काम करणार आहेत. ते देशमुख कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत आणि या खून प्रकरणाची पाळंमुळं कुठपर्यंत आहेत याचा आढावा घेणार आहेत, अशी माहिती खासदार बजरंग सोनावणे यांनी दिली.
बीड जिल्ह्यात अनेक घटना घडल्या आहेत. खोलात जाऊन गुन्हेगारांवर कारवाई करावी यासाठी शरद पवार स्वतः तिथे जात आहेत. ही घटना खूप वाईट आहे, आरोपींना शिक्षा झाली पाहिजे यासाठी शरद पवार बीडमध्ये येत आहेत. बीडमध्ये आम्ही गुण्या गोविंदाने राहत आहोत, यात राजकीय हेतू अजिबात नाही, असे ते म्हणाले.
संतोष देशमुख खून प्रकरणी ७ आरोपी दाखवले आहेत, त्यातले २ आरोपी पहिल्या दिवशी अटक केले होते. मात्र, त्यांच्याकडून काय सामान जप्त केले ते पोलिसांनी सांगितले नाही. अजित पवार गटाच्या तालुका अध्यक्षाला आज अटक झाल्याचे समजते. आतापर्यंत ४ आरोपींना अटक झाली आहे, आणखी ३ आरोपी फरार आहेत, त्यांना अटक झाली पाहिजे. CBI मार्फत चौकशी व्हावी ही माझी मागणी आहे. पंकज कुमावत सारख्या अधिकाऱ्याकडे तपास दिला पाहिजे ही माझी मागणी आहे. माझं मुख्यमंत्री यांच्याशी काही बोलणं झालं नाही, असे सोनवणे म्हणाले.