बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अटक

संतोष देशमुख हत्या प्रकरण: आरोपी विष्णू चाटे अटकेत

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी विष्णू चाटेला पोलिसांनी अटक केली आहे. या हत्या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींची संख्या आता चारवर गेली आहे. विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी आहे. त्याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.

संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांची गाडी अडवून सहा ते सात जणांनी त्यांचे अपहरण केले. त्यांना बेदम मारहाण करून नंतर त्यांची हत्या करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली होती, आता चौथ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे चार दिवसांपूर्वी निलंबन करण्यात आले आहे. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याला केज शहरातील एका हॉटेलमध्ये भेटल्याचे दिसत आहे.

error: Content is protected !!