बीड, दि. १६ (प्रतिनिधी): मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या भेटीच्या वेळी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखही त्या ठिकाणी उपस्थित होते. या भेटीनंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुखांची हत्या झाली होती.
धनंजय देशमुख यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे की, “मी आणि माझा मित्र त्या हॉटेलमध्ये चहासाठी गेलो होतो. त्यानंतर काही वेळाने पीएसआय पाटील साहेब आणि आरोपी त्या ठिकाणी आले. नंतर पीएसआयनी मला बोलावून घेतलं आणि भांडणासंबंधी विचारलं. त्यावर आता ते मिटलं असल्याचं आपण सांगितलं आणि नंतर ते निघून गेले.”
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या आदल्या दिवशी आरोपी सुदर्शन घुले आणि पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील हे केज शहरातील बसंत बिहार उडपी हॉटेलमध्ये भेटले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे दोघे बोलत असताना चार मिनिटांनी त्या ठिकाणी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आले आणि त्यानंतर या तिघांमध्ये काहीतरी चर्चा झाल्याचे व्हिडिओतून स्पष्ट होते.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस या दिशेने तपास करत आहेत. या प्रकरणात सात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर इतर चार आरोपी अद्याप फरार आहेत. तसेच या प्रकरणात कारवाईसाठी दिरंगाई करणारे पोलिस निरीक्षक महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे आणि पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे.