बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव आल्याने धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत, कारण वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे मानले जातात. अखेर या विषयावर सभागृहाबाहेर धनंजय मुंडे पत्रकारांशी बोलले.
धनंजय मुंडे म्हणाले, “त्यांच्या सख्ख्या भावाने, धनंजय देशमुख यांनी स्वतः स्टेटमेंट केले आहे. ते स्टेटमेंट केल्यानंतर अशा अतिशय घाणेरड्या घटनेत माझा संबंध लावणे म्हणजे यांना कुठेतरी राजकारण आणायचे आहे. मूळात आता हा विषय सभागृहात आणला आहे. आदरणीय मुख्यमंत्री स्वतः यावर बोलणार आहेत. ही घटना का झाली? कशी झाली? याला काय कारण आहे? कोण जबाबदार आहे? काय चौकशी झाली? किती आरोपींना अटक झाली? याबाबत मुख्यमंत्री स्वतः बोलणार आहेत, तोपर्यंत थांबा.”
वाल्मिक कराड यांच्यासोबत फोटो व्हायरल होत असल्याबद्दल धनंजय मुंडे म्हणाले, “बीड जिल्ह्यातून अनेक जण येतात, फोटो काढतात. त्यामुळेच मला आज दीड तास उशिर झाला. त्यांना आमच्यासोबत फोटो काढायचा असतो, आम्हाला तो द्यायचा असतो. ते त्या फोटोच व्यक्तीगत जीवनात काय करतात, याचा संबंध आमच्याशी येत नाही. अशा घाणेरड्या प्रवृत्तीला, खून करणाऱ्या लोकांना आम्ही मदत करतोय, पाठबळ देतोय असे कधी जमले नाही. आजपर्यंत राजकारणात, समाजकारणात इतक्या वर्षांत असे कधी केलेले नाही.”
प्रकरणात कारवाई पहिल्या दिवशी झाली. चार आरोपींना अटक झाली आहे. पोलिसांच्या आठ टीम तयार करण्यात आल्या आहेत. आरोपींना अटक होईल. मी या विषयी जास्त बोलण्यापेक्षा आदरणीय मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत, ते स्वतःच निवेदन करणार आहेत. त्यामुळे मी हाऊसच्या बाहेर बोलणे हे मी हाऊसचा अपमान केल्यासारखे आहे,” असे धनंजय मुंडे म्हणाले.