बीडमध्ये मध्यरात्री  घरात घुसून जुन्या वादातून गोळीबार; जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे

बीड, दि. १३ (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात मस्साजोग येथे सरपंचाची हत्या झाल्यानंतर आता जुन्या वादातून बीडमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.

विश्वास दादाराव डोंगरे (रा. इमामापुर रोड, बीड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. डोंगरे व आठवले यांच्यात जुना वाद आहे. यापूर्वी दोन्ही गटांमध्ये मारहाणीची घटना घडली होती. याप्रकरणी परस्पर तक्रारीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

शुक्रवारी (दि. १३) मध्यरात्री दोनच्या सुमारास अक्षय आठवले याने डोंगरे यांच्या इमामापुर रोडवरील घरात घुसून गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात डोंगरे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. प्रकरणाचा अधिक तपास पेठ बीड पोलीस करत आहेत.

पोलिसांची तात्काळ कारवाई

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी तातडीने पेठ बीड पोलिसांना गुन्हा दाखल करून आरोपीच्या अटकेचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पेठ बीड पोलीस ठाण्यातील एक पथक जखमीचा जबाब घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले आहे.

या घटनेमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

error: Content is protected !!