बीड, दि. ९ (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात खून, मारामाऱ्या आणि अपहरणाच्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असताना पोलीस निपक्षपातीपणे कारवाई करायचे सोडून अशासकिय लोकांच्या दबावात काम करत आहेत. यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारीने कळस गाठला असून जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी व्हावी, अपहरणांच्या प्रकरणांची सीबीआय मार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी अमित शहा यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिले.
कायदा व सुव्यवस्थेची स्थिती
आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब यांची भेट घेतली. जिल्ह्यात बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत शहा यांना निवेदन दिले. बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत खराब झालेली आहे. कोणत्याही प्रकरणात अशासकिय लोकांचा हस्तक्षेप होत असल्याने पोलीस यंत्रणा हातचे बाहूले बनून काम करत आहे. अर्थातच पोलीस निपक्षपातीपणे काम करत नाहीत. परिणामी, जिल्ह्यात वाळूमाफिया, भुमाफिया, गुटखा माफिया, खंडणी, खून, अवैध शस्त्रांचा व्यापार फोफावत आहे.
अपहरण प्रकरणे
परळीत अमोल डुबे यांचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्यात आली. यानंतर त्यांना अंधाऱ्या रात्री घाटात सोडून दिले. मस्साजोग येथील सरपंच पती संतोष देशमुख यांनी पवनचक्की प्रकरणात खंडणीला विरोध केला म्हणून अपहरण करून हत्या केली. संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्याचे कळताच मी जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांना सलग फोन केले. मॅसेजेस केले परंतु संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला. पोलीस अधिक्षक यांचा संपर्क होऊ शकला असता तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. यामुळे पोलीस अधिक्षकांच्या भुमिकेबाबत संशय निर्माण होत आहे.
अन्य गुन्हेगारी प्रकरणे
बीड जिल्हा पोलीसांकडून खोट्या केसेस करणे आणि खऱ्या अपराधाकडे दुर्लक्ष करणे सर्रासचे झाले आहे. यामुळे कायद्याची अमलबजावणी होणे अशक्य झाले आहे. पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती गोवर्धन सानप हे दोन दिवस बेपत्ता होते. त्यांचा ग्रामस्थांनी शोध घेतला परंतु दोन दिवसांनी त्यांचे प्रेत शेतात आढळून आले. हा मृत्यू कशामुळे झाला, याचेही ठोस कारण पोलीसांनी दिलेले नाही. याबाबतही संशय आहे.
सीबीआय चौकशीची मागणी
अशा अपहरणांच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, याच बरोबर जिल्हा पोलीस दलाबाबत सामान्य माणसांच्या मनात अविश्वास निर्माण झालेला आहे. यामुळे केंद्रीय सुरक्षा यंत्रणेकडून विशेष पथक बीड जिल्ह्यात पाठवून याठिकाणी कारवाया कराव्यात, जेणेकरून पोलीसांकडून आयपीसी कलमांचा दुरूपयोग होणार नाही, पोलीस यंत्रणा कोणाच्या दबावात काम करणार नाही. याचबरोबर पवनचक्की कंपन्यांच्या गुंडांनी जो गुन्हेगारीचा आलेख वाढविण्याचे काम केले आहे तो आलेखही कमी होईल, गुंडगिरीचा वापर करत असल्यामुळे पवनचक्की कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत असेही पत्रात म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आश्वासन
याविषयावर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी तातडीने ठोस पाऊले उचलली जातील, असे आश्वासन दिले. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी केंद्रीय सुरक्षा यंत्रणेकडून विशेष पथक पाठवले जाईल, असे त्यांनी सांगितले.