नेकनूर (प्रतिनिधी): नेकनूर ग्रामपंचायत ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून तिला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होतो. ग्रामपंचायतीच्या कर्तव्यात स्वच्छतेसह मूलभूत सुविधा पुरविणे अपेक्षित आहे, परंतु निवडणुकीनंतर सदस्यांनी या कर्तव्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतीचा कारभार निव्वळ गोंधळाचा झाला आहे.
ग्रामपंचायतीमध्ये 17 सदस्य असून विविध वार्डांत अस्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने केवळ प्रचारापुरतीच ठरल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात येत आहे. सदस्यांनी त्यांच्या वार्डांतील समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. स्वच्छता, पाणीपुरवठा, नालेसफाई आणि रस्ते यांसारख्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. विशेषतः आठवडी बाजाराच्या ठिकाणी घाण साचल्याने परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे.
गावातील विकासकामांबाबतही उदासीनता दिसून येत आहे. ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेमुळे विकास ठप्प झाला असून गावकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
निष्क्रिय ग्रामविकास अधिकाऱ्यांची बदलीची मागणी
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्यांच्या बदलीची मागणी होत आहे. सरपंच व सदस्यांमध्ये गटबाजीमुळे गावाचा विकास थांबला आहे. ग्रामपंचायतीने राजकीय वाद बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. योग्य नियोजन व समन्वयानेच गावाच्या समस्यांवर तोडगा निघू शकेल.