द्वारकाधीश मित्र मंडळाचे धाडसी युवा नेतृत्व वैभव वैद्य यांचे निधन

बीड, (प्रतिनिधी): द्वारकाधीश मित्र मंडळाचे विश्वस्त आणि धाडसी युवा नेतृत्व म्हणून सर्वत्र परिचित असलेले वैभव विनायक वैद्य यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना रविवार, दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे ४:३० वाजता दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते अवघ्या ३० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वाजता बीड येथील अमरधाम स्मशानभूमी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

वैभव वैद्य हे बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सचिव आणि बीड शहरातील ज्येष्ठ संपादक पत्रकार विनायक वैद्य यांचे चिरंजीव होते. द्वारकाधीश मित्र मंडळाचे विश्वस्त म्हणून वैभव वैद्य यांनी सर्वसामान्य युवा वर्गात मिळून मिसळून काम केलेले आहे. त्यांच्या निधनामुळे द्वारकाधीश मित्र मंडळाचे ‘वैभव’ हरपले अशी भावना व्यक्त होऊ लागली आहे.

वैभव वैद्य हे द्वारकाधीश मित्र मंडळामार्फत परशुराम गुरखुदे यांच्या अत्यंत विश्वासाचे युवा नेतृत्व म्हणून परिचित होते. कोणत्याही गरजवंतांच्या कामाला धाडसाने धावून जाणारे नेतृत्व म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. सर्व जाती धर्मातील सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. छत्रपती शिवाजी महाराज जयंती, स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती, गणेश उत्सव, राम नवमी उत्सव व इतर अनेक धार्मिक कार्यात ते विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्स्फूर्तपणे सहभाग घेत असत. युवकांचे मोठे नेटवर्क संघटित करून द्वारकाधीश मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी परशुराम गुरखुदे यांच्या पाठीशी मोठी ताकद उभा केली होती. युवा वर्गात त्यांची एक वेगळी छबी आणि दरारा होता.

मागील आठवड्यामध्ये वैभव वैद्य यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बीडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती जास्त खालवल्याने त्यांना ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती जास्तच बिघडल्याने प्राणज्योत मालवली.

वैभव वैद्य यांच्या दुःखद निधनाच्या बातमीवर विश्वासच बसत नाही. एक हरहुन्नरी, हजरजबाबी निर्णय घेण्याची तात्काळ क्षमता असलेला धाडसी युवा नेता अशा पद्धतीने अचानक जाईल असे स्वप्नातही वाटत नाही. वैभव वैद्य यांच्या अचानक निधनाने द्वारकाधीश मित्रपरिवार पोरका झाला आहे. त्यांच्या पश्चात वडील पत्रकार विनायक वैद्य, आई, पत्नी, एक मुलगा, चार बहिणी, मेव्हणे असा मोठा परिवार आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली….!

error: Content is protected !!