दि. २३ : गेवराई विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विजयसिंह पंडित यांनी बदामराव पंडित यांना पराभूत करत दणदणीत विजय मिळवला. विजयसिंह पंडित यांना १,१६,१४१ मते मिळाली, तर शिवसेना उबाठा गटाचे बदामराव पंडित यांना ७३,७५१ मते मिळाली. त्यामुळे विजयसिंह पंडित यांनी जवळपास ४२,३९० मतांनी विजय मिळवला आहे. अपक्ष उमेदवार लक्ष्मण पवार यांना यावेळी केवळ ३८,१७१ मते मिळाली आहेत. त्यामुळे लक्ष्मण पवार आता माजी आमदार तर विजयसिंह पंडित हे आजपासून गेवराईचे आमदार झाले आहेत. मागच्यावेळी विजयसिंह पंडित यांना लक्ष्मण पवार यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला होता. यावेळी त्यांनी दणदणीत विजय मिळवत या पराभवाचा वचपा काढला आहे.
माजी आ. अमरसिंह पंडित यांनी आपले बंधू विजयसिंह पंडित यांच्यासाठी १२५००० मतांचे नियोजन केले होते. त्यात त्यांना १,१६,१४१ मते मिळाली. अमरसिंह पंडितांनी मांडलेली आकडेवारी इतक्या अटीतटीच्या लढतीत चुकणार असेच जाणकार सांगत होते. मात्र अमरसिंह पंडितांनी ह्या आकडेवारीच्या जवळ आपल्या बंधुला नेऊन सोडले. त्यामुळे विजयसिंह पंडित यांचा ४२,३९० मतांनी दणदणीत विजय झाला.
शिवाजीदादा पंडित भावनिक साद
शिवछत्र परिवारावर विधानसभेच्या विजयाचा गुलाल पडलेला नव्हता. शिवछत्र परिवाराचे आधारवड असलेले शिवाजीदादा पंडित यांनी यावेळी अनेक गावात जावून मतदारांना मला विजयला आमदार झाल्याचे पाहायचेय अशी भावनिक साद घातली होती. तर विजयसिंह पंडित यांनी देखील मला एकदा दादाला आमदार झाल्याचे दाखवून द्यायचे आहे असे म्हणत मतदारांना भावनिक आवाहन केले होते.