बीड दि. १८ (प्रतिनिधी):- प्रत्येक वेळेस निवडणुक जटिल होत चाललेली आहे. यावेळी तर प्रत्येक पक्षाचे दोन पक्ष झाल्यामुळे आणि त्यात अपक्षांमध्ये एकी नसल्यामुळे कोण उमेदवार निवडून येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून मत कोणाला टाकावे, हे देखील अनेकांना कळत नसल्याचे दिसत असल्याचे मत जन आंदोलनाचे विश्वस्त अॅड. अजित एम. देशमुख यांनी म्हटले आहे. केवळ सत्ता मिळवणे हा अनेकांचा उद्योग आहे. सत्ता मिळवल्यानंतर लोक विकासाची कोणती कामे केली, हे सांगण्याचे सुद्धा पुढाऱ्यांमध्ये धाडस नाही.
तरी देखील मतदार शांतपणाने भाषणे ऐकून घेतात. हेच स्वातंत्र्यानंतरचे खरेखरे दुर्दैव असल्याचे मत देखील देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
या वर्षीच्या निवडणुकीत जिल्हाभरातील उमेदवार पाहता प्रत्येक पक्षाचे दोन पक्ष झाल्यामुळे उमेदवारांची संख्या पक्षांच्या संख्येप्रमाणे वाढलेली आहे. त्याचप्रमाणे अनेक अपक्ष उमेदवारांना वेगवेगळ्या लोकांनी उभे केले असल्याचे म्हटले जात आहे. त्यात काहीही वावगे नाही. कारण पक्ष चालविणाऱ्यांनी या अपक्षांची हकालपट्टी केलेली नाही. यात सुद्धा पाडापाडीचे राजकारण असू शकते.
जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारांची संख्या या सर्व प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच अपक्षांची संख्या देखील वाढली आहे. हे अपक्ष कोणाला पाडतात, यावर बरेच चित्र अवलंबून असणार आहे. वेगवेगळ्या पक्षांना देखील याचा धक्का बसू शकतो. मात्र काही ठिकाणी अपक्षांमध्ये चर्चा होऊन खंबीर नेतृत्व समोर आणले जात नसल्याने मतदारांच्या संभ्रमावस्थेत वाढ झाल्याचे दिसत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या निवडणुकीमध्ये घटना बदलू म्हणणारे यावेळी घटनेबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत. यावरून त्यांनी धास्ती घेतल्याची दिसते. मतदार खऱ्या अर्थान जागा नसल्यामुळे चुकीचे लोक बऱ्याच वेळेला निवडून दिले जातात. त्यातून गुंडगिरी आणि दहशत वाढते. त्यामुळे यावेळी मतदारांनी जागरूकपणाने मतदान करावे. देशाच्या विकासाला हातभार लावावा. निरपेक्ष मतदान करून विकासाला चालना द्यावी, असेही अॅड. देशमुख यांनी म्हटले आहे