बीड दि.7 (प्रतिनिधी):
ऐन दिवाळीमध्ये आणि दिवाळी संपल्यानंतरही बीड शहरांमध्ये काही भागात अचानक अचानक वाहतुक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासंदर्भात शहर वाहतूक शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. मात्र पोलीस उघड्या डोळ्यांनी हे पाहत असल्यामुळे याचा त्रास नागरिकांना होत आहे.
बुधवार दि.07 नोव्हेंबर 2024 दुपारी 12.30 वाजल्यापासून शिवाजी पुतळा भागात वाहतुकीची मोठी कोंडी झाली. शिवाजी पुतळा ते नगर रोड या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक सुरळीत होण्याबाबत ट्राफिक पोलिसांनी खबरदारी घ्यायला हवी. मात्र तसे होताना दिसत नाही. एखाद दुसरा पोलीस पावत्या फाडण्यासाठी आणि सावज शोधताना दिसून येतो. या वाहतूक कोंडीमुळे मात्र बीड शहरातील सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. नुकतीच दिवाळी संपल्यामुळे बाहेरून येणाऱ्या वाहनधारकांची आणि पादाचाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे आणि वाहतूक सुरळीत करणे गरजेचे आहे.
शहर पोलिसांची बघ्याची भूमिका
बीड शहरातील सुभाष रोड ते बशीरगंज दरम्यान भाजी मंडईत दिवाळीत गर्दी होणे सहाजिक आहे. मात्र या भागात आशियाना हॉटेलसमोर अस्ताव्यस्त रस्त्यावर वाहने उभी केली जातात. तसेच रस्त्यावर भाजी विक्रेते रस्तावर दोन्ही बाजूने बसतात. त्यामुळे सातत्याने नेहमीच वाहतुकीला अडथळा होतो. याबाबत शहर पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी रुजू झाल्यानंतर दोन-चार वेळा शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. मात्र आता बल्लाळ ढिले पडले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.