पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या अनुषंगाने १८, १९ आणि २० नोव्हेंबर रोजी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे शाळा भरवणे शक्य नसल्यास शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना देण्याचे निर्देश शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणूक प्रक्रियेतील कामकाज आणि प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेत शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. तसेच अनेक मतदान केंद्रेही शाळांमध्ये असतात. मतदानासाठीची तयारी करण्यासाठी निवडणूक प्रशासन शाळा ताब्यात घेते. या पार्श्वभूमीवर १८, १९ आणि २० नोव्हेंबर रोजी शाळांना सुटी देण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाने शिक्षण विभागाला सादर केला होता.
राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२०४ सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबत आयुक्त स्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, असे नमूद करण्यात आले आहे.