आरोग्य विभागात नोकरी लावण्याच्या बाता मारत २८ लाख ६५ हजार घेऊन भामटा पसार

केज : आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एकाने भामट्याने सहा जणांची फसवणूक करून त्यांच्याकडून २८ लाख ६५ हजार रुपये उकळले. हा खळबळजनक प्रकार केजमध्ये उघडकीस आला. याप्रकरणी लक्ष्मणआप्पा मलंगे या भामट्याविरूद्धात केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज येथील भगवान बिभीषण गाडवे हे चहाचे हॉटेल चालवितात. २० ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांच्या ओळखीच्या अंकुश दामोदर मोरे (रा. भालगाव ता. केज) यांनी त्यांना आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. मोरे यांच्या मते, त्यांच्या ओळखीचे जिंतूर येथील लक्ष्मणआप्पा वैजनाथआप्पा मुलंगे हे आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे काम करतात आणि त्यांची गुप्ता नावाच्या एका बड्या अधिकाऱ्याची ओळख आहे. मोरे यांनी स्वतःही आपल्या मुलाला नोकरी लावण्यासाठी मलंगे यांना दीड लाख रुपये दिले होते.

६ नोव्हेंबर २०२२ रोजी गाडवे आणि मलंगे यांची भेट झाली. मलंगे यांनी नोकरीसाठी १२ लाख रुपये लागतील, असे सांगितले आणि पहिल्यांदा काही रक्कम देण्याची मागणी केली. २० एप्रिल २०२३ रोजी मलंगे यांनी गाडवे यांच्याकडून ५ लाख रुपये मागितले. गाडवे यांनी २ लाख २५ हजार रुपये दिले. त्यानंतर एक ते दीड महिन्यात मुलाचे नाव यादीत येईल, असे आश्वासन देऊन मलंगे पैसे घेऊन निघून गेला.

२७ एप्रिल २०२३ रोजी मलंगे याने पुन्हा गाडवे यांना फोन करून आरोग्य विभागातील एका टेबलवर देण्यासाठी ५० हजार रुपये मागितले. गाडवे यांनी त्याला २५ हजार रुपये ऑनलाइन पाठवले. त्यानंतर १६ मे २०२३ रोजी मलंगे याने पुन्हा १५ हजार रुपये मागितले. अशा प्रकारे गाडवे यांनी एकूण २ लाख ६५ हजार रुपये मलंगे याला दिले.

तथापि, मलंगे याने आपला फोन बंद करून ठेवला आणि नोकरीबाबत काहीही पाठपुरावा केला नाही. त्यानंतर गाडवे यांनी मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, मोरे यांनीही मलंगे यांनी आपल्याला फसवल्याचे सांगितले. तसेच मोरे यांच्या ओळखीच्या इतर काही व्यक्तींनाही मलंगे याने अशाच प्रकारे फसवल्याचे उघड झाले.

या सर्व घटनांची माहिती मिळाल्यानंतर गाडवे यांनी केज पोलिसांत धाव घेत लक्ष्मणआप्पा मलंगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक बालासाहेब रोडे हे करत आहेत.

error: Content is protected !!