पडद्यामागून कोणीतरी मुंडे, महाजन ही नावे देशाच्या राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करतोय

मुंबई | राज्यसभेच्या निवडणुक होत असताना राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीने राजकारण तापलं आहे. सर्वंच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहे. मात्र, अनेक दिग्गजांना उमेदवारी नाकारल्याने नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाव न घेता भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.

कोणाला उमेदवारी द्यावी आणि कोणाला देऊ नये हा भाजपचा अंतर्गत विषय आहे. मग कोणीही असेल खडसेंना द्यायचं की डावलायचं हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, मुंडे आणि महाजन यांचा शिवसेना भाजप युतीच्या काळात निकटचा संबंध आला होता. या दोन नेत्यांमुळे युतीला बळ मिळाले होते, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

गोपीनाथ मुंडे लोकनेते होते. त्यांच्या कुटूंबियांच्या बातम्या अधिक व्यथित करणाऱ्या आहेत. पंकजा मुंडे या त्यांच्या वडिलांप्रमाणे  ओबीसींच्या नेत्या आहेत. बहुजन समाजाच्या नेत्या आहेत. पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्यानंतर ज्या प्रकारचे पडसाद विविध क्षेत्रात उमटले ते पाहिल्यावर वाटतं की, कोणी तरी पडद्यामागून मुंडे, महाजन यांची नावे देशाच्या राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, फक्त मुंडे कुटूंबाचा विषय होता म्हणून बोललो. आजही मुंडे नावाचा प्रभाव आणि पगडा महाराष्ट्राच्या   राजकारणावर आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. काही नेत्यांकडून पंकजा मुंडे यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न होत आहे, अशा चर्चा माध्यमांमध्ये सुरू  होत्या. त्यावरून विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांना माझा पाठिंबा आहे. पंकजा मुंडे कोणत्याही पदासाठी पात्र आहेत. त्या आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

error: Content is protected !!