भांडवली बाजारात गुंतवणूकदारांची होरपळ सुरूच आहे. आज मंगळवारी बाजार सुरु होताच सेन्सेक्स तब्बल १००० अंकांनी कोसळला आणि तो ५७ हजार अंकाच्या पातळीखाली घसरला. निफ्टीमध्ये देखील मोठी पडझड झाली आहे.
हायलाइट्स:
- आज मंगळवारी बाजार सुरु होताच सेन्सेक्स १००० अंकांनी कोसळला.
- काही मिनिटांच्या पडझडीत गुंतवणूकदारांना तब्बल तीन लाख कोटींचा फटका बसला.
- कालचा दिवस गुंतवणूकदारांसाठी ब्लॅक मंडे ठरला होता.
मुंबई : करोनाची तिसरी लाट, जानेवारी महिन्यातील सौदापूर्ती, आगामी अर्थसंकल्प, आखातातील अस्थिरता, फेडरल रिझर्व्हचे धोरण आणि वाढती महागाई या एक ना अनेक घटकांनी भांडवली बाजारात प्रचंड नकारात्मकता पसरली आहे. आज सलग सहाव्या सत्रात मोठी घसरण दिसून आली. आज मंगळवारी बाजार सुरु होताच सेन्सेक्स १००० अंकांनी कोसळला. काही मिनिटांच्या पडझडीत गुंतवणूकदारांना तब्बल तीन लाख कोटींचा फटका बसला.मागील आठ्वड्यापासून भांडवली बाजार अस्थिर झाला आहे. आर्थिक अनिश्चितता आणि फेडरलची संभाव्य व्याजदरवाढ याचा मोठा परिणाम गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर झाला आहे. विशेषतः परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी पैसे काढण्याला प्राधान्य दिले आहे. ज्यामुळे बाजारात प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. कालचा दिवस गुंतवणूकदारांसाठी ब्लॅक मंडे ठरला होता. कालच्या सत्रात सेन्सेक्स १५४५ अंकांनी तर निफ्टी ४६८ अंकांनी कोसळले. या पडझडीत गुंतवणूकदारांनी तब्बल १९. ५० लाख कोटी रुपये गमावले होते.
आजच्या सत्राची सुरवात निर्देशांकांनी मोठ्या घसरणीने केल्याने गुंतवणूकदार चांगलेच धास्तावले आहेत. मात्र १००० अंकाची आपटी घेणारा सेन्सेक्स आता त्यातून सावरला आहे. सध्या सेन्सेक्स ५७४६७ अंकांवर असून त्यात २४ अंकाची घसरण झाली आहे. निफ्टी ९ अंकानी वधारला असून तो १७१५७ अंकांवर आहे.
बाजार सुरु झाला तेव्हा सेन्सेक्समधील ३० पैकी २६ शेअर घसरले आहेत. त्यात एनटीपीसी, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय,रिलायन्स , एचडीएफसी, एलअँडटी , इन्फोसिस , टीसीएस या शेअरमध्ये घसरण झाली आहे. तर ऍक्सिस बँक, भारती एअरटेल, पॉवरग्रीड, टाटा स्टील या शेअरमध्ये वाढ झाली आहे. याशिवाय वोडाफोन, ऍक्सिस बँक, सेल, पीएनबी, आयडीएफसी बँक, बँक ऑफ बडोदा, भेल या शेअरमध्ये वाढ झाली आहे. आज आशियातील सिंगपूर, हॉंगकॉंग या शेअर बाजारात मोठी घसरण झाली.