बार्शी – सोलापूर जिल्ह्यातील अनेकांना कोट्यावधींचा गंडा घालणारा विशाल फटे अखेरीस काल रात्री पोलिसांना शरण आला आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली बार्शीतील अनेकांचे पैसे घेऊन विशाल फटे गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता.
फटेच्या विरोधात अनेक तक्रारी देखील दाखल झाल्या होत्या. पण विशाल फटेने अनेक दिवसांनंतर काल एक २७ मिनिटांचा यूट्यूब व्हिडीओ अपलोड करत स्वतःची बाजू मांडली होती आणि पोलिसांसमोर हजर होत असल्य़ाचे संकेत दिले होते.
फटे अखेर रात्री ८ वाजताच्या सुमारास स्वतःहून सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयात हजर झाला. जिल्हा शासकीय महाविद्यालयात काल रात्री त्याची वैद्यकीय चाचणी करून त्याला आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. त्याच्यावर काय कारवाई होते याकडे सोलापूरातील अनेक गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान यूट्यूब लाईव्ह व्हिडीओत बार्शीतील फटे प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल फटेने स्वतःची बाजू मांडली होती. माझा लोकांना फसवण्याचा कोणताही हेतू नव्हता, काही चुका झाल्यामुळे पैसे अडकले. माझ्या चुका मला मान्य असून मी शिक्षा भोगायला तयार आहे. पोलिसांसमोर आज हजर होणार असल्याचेही त्याने म्हटले होते.
घडलेल्या प्रकरणाबाबत त्याने स्वतःच्या युट्युब चॅनेलवरून स्पष्टीकरण दिले होते. 27 मिनिटे 37 सेकंदचा व्हिडीओ अपलोड करून त्यानं स्वतःची बाजू मांडली होती. विशालने म्हटले होते की, अनेकांनी चर्चा केली की 200 कोटींचा घोटाळा आहे. पण मला लोकांचे जास्तीत जास्त 10 कोटी रुपये द्यायचे असल्याचे तो म्हणाला होता.
तो म्हणाला की, इज्जतीला घाबरुन मी सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्याविरोधात अंबारेने केस केली. त्याने मला विचारायला हवे होते. त्याच्याकडे जमीन, गाड्या, सोने झाल्याचे तो म्हणाला. सहा महिन्याच्यावर मी कुणाचेही पैसे ठेवले नाही. माझ्यावर त्याने पुरावे नसताना आरोप केल्याचेही तो म्हणाला होता.
10 लाखाचे 6 कोटी करणार याबाबतही चर्चा केली. मी सगळा डेटा लोकांना दिला आहे. कुणाचेही पैसे मला बुडवायचे नव्हते आणि नाहीत. मी दोन दिवसात गोष्टी मॅनेज केल्या असत्या पण अचानक केसेस पडू लागल्या. ज्या लोकांकडून पैसे येणे अपेक्षित होते, ते आले नाहीत. सगळ्या वाईट गोष्टींची चैनच सुरु झाली. आता माझ्या आवाक्याच्या बाहेर गोष्ट केली. लोकांनी मला वेळ दिला नाही. आता त्यांनी मला वेळ द्यावा, अशी अपेक्षाही नसल्याचे तो म्हणाला होता.