Maharashtra Bandh : लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंदची हाक

Maharashtra Bandh : लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंदची हाक

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेत उद्या (11 ऑक्टोबर) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनेही यासाठी सहमती दर्शवली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, व्यापारी वर्गात बंदला पाठींबा देण्यावरुन संमिश्र प्रतिक्रिया दिसत आहेत.

[ihc-hide-content ihc_mb_type=”block” ihc_mb_who=”” ihc_mb_template=”” ]

महाराष्ट्र बंदला पुणे व्यापारी महासंघाचा पाठिंबा 
महाविकासआघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला आहे. महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद राखा यांनी ही माहिती दिली. तर दुसरीकडे व्यापाऱ्यांची अनेक संघटना असलेल्या रिटेल व्यापारी संघाने मात्र उद्याच्या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या हत्येचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती लावून ते काम सुरूच ठेवणार असल्याचं रिटेल व्यापारी महासंघाकडून सांगण्यात आले आहे.

अभिनेते सयाजी शिंदे यांचा बंदला पाठींबा
अभिनेता सयाजी शिंदे यांनी लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला असून उद्याच्या बंदला पाठिंबा दर्शवला आहे.

बंदमध्ये शिवसेना अग्रेसर असणार : एकनाथ शिंदे 
विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे पुण्यात आले असता पत्रकारांशी बोलताना म्हणाले की उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये शिवसेना अग्रेसर असणार असून महाविकास आघाडीतर्फे निषेध म्हणून उद्याचा बंद यशस्वी करणार आहे.

नागपूर येथील व्यापाऱ्यांनी विरोध
उद्याच्या महाराष्ट्र बंदच्या महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या हाकेला नागपूर येथील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने आम्हाला उद्याचा बंद पाळता येणार नाही, असं जाहीर केलंय. सणासुदीचे दिवस असून एक दिवसही बाजार बंद ठेवणे कठीण आहे, एक दिवस दुकान बंद असले तरी ग्राहक ऑनलाईनचे पर्याय निवडत आहे, त्यामुळे ज्यांना या समर्थनात बंद ठेवायचे आहे, त्यांनी ठेवावे, पण ज्यांचा या बंदला पाठिंबा नाही त्यांचे दुकान जबरदस्तीने बंद ठेवू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, अशी आशा नाग विदर्भ चेम्बर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी व्यक्त केली.

काय म्हणाले महाविकास आघाडीचे नेते
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लखीमपूर हिंसाचारावर चर्चा करण्यात आली. त्या घटनेत निधन झालेल्या व्यक्तींना मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. यादिवशी अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक सेवा सोडून इतर सर्व दिवसभर बंद राहिल अशी माहिती मंत्री जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर यांनी दिली होती.  हा बंद पक्षाच्या वतीने आहे सरकारच्या वतीने नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं होतं. तर शेतकऱ्यांचा पाठीशी शिवसेना नेहमी राहिली आहे, त्यामुळे बंदमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. शेतकरी आंदोलन चिरडताना भाजपची मानसिकता दिसून आली, जनरल डायरच्या भूमिकेत भाजप दिसून आली, असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते. 
  
शरद पवार म्हणाले…
शरद पवार यांनी काल बोलताना म्हटलं होतं की, उत्तरप्रदेशाबाबत माझ्यासह सर्वच विरोधकांनी खंबीर भूमिका घेतली, महाराष्ट्र सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत लखीमपूर घटनेचा निषेध केला. मी स्वत: शेतकऱ्यांवरील या हल्ल्याची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडासोबत केली, त्याचा संताप व राग सत्ताधारी पक्षातील लोकांना आला आहे, त्याची प्रतिक्रीया म्हणूनच महाराष्ट्रात प्राप्तिकर विभागाचे छापासत्र आहे अशी शक्यता नाकारता येत नाही, असं पवार म्हणाले. 

अजित पवार काय म्हणाले 
दरम्यान अजित पवारांनी म्हटलं आहे की, आयटीनं कुठे छापे टाकावेत हा त्यांचा अधिकार आहे. काही शंका असल्यास ते छापे टाकू शकतात. माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. मी नियमित टॅक्स भरतो. अर्थमंत्री असल्यानं आर्थिक शिस्त कशी राखायची, कुठलाही कर कसा चुकवायचा नाही, टॅक्स कसा भरायचा असतो हे आपल्याला चांगलं माहिती आहे. पण अजित पवारांचे नातेवाईक म्हणून हे छापे टाकले गेले असतील तर राज्यातील जनतेनं याचा जरूर विचार करावा, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. 

[/ihc-hide-content]

error: Content is protected !!