ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांना ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा अधिक धोका – WHO

जिनिव्हा – करोनाच्या डेल्ट प्लस या जातीच्या विषाणूचा जगातील किमान 85 देशांमध्ये प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. या विषाणूमध्ये अत्यंत कमी वेळात अधिक जणांना बाधित करण्याची क्षमता आहे. हा विषाणू ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांच्यामध्ये अत्यंत वेगाने पसरतो आहे ही बाब अधिक चिंता निर्माण करणारी आहे असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख तेड्रोस घेब्रेयेसुस यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की, करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर काही देशांनी आपल्या देशातील लोकांच्या वावरावरील निर्बंध काढून टाकले आहेत. त्यामुळे या नव्या विषाणूंच्या प्रादुर्भावाचा मार्गच प्रशस्त होताना दिसत आहे. या विषाणूचा प्रसार आपण योग्य त्या उपाययोजना आणि निर्बंधांमधून रोखू शकतो. त्याकडे आता आपल्या सर्वांनाच लक्ष केंद्रित करावे लागणार आहे असे त्यांनी म्हटले आहे.

राज्यासह देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरीही संकट काही कमी होताना दिसत नसल्याचे दिसून येत आहे. राज्यात जर करोनाची संभाव्य तिसरी लाट येऊन धडकली तर साधारण ५० लाख लोकांना संसर्ग होऊ शकतो. त्यापैकी १० टक्के म्हणजे ५ लाख लहान मुलं या तिसऱ्या लाटेचं लक्ष्य होऊ शकतात, असा अंदाज बांधला जात आहे.

हे सर्व सुरु असतानाच आता  देशावर करोनाच्या डेल्ट प्लस या जातीच्या विषाणूचे संकट आले आहे. देशातील अनेक राज्यांनी निर्बंध हटवले आहेत. मात्र डेल्टा व्हेरिएंटचे नवीन संकट देशासमोर आल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही राज्यांना खबरदारीचा इशारा दिला आहे. दरम्यान, कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आता केंद्र सरकारने देखील कंबर कसली असून लसीकरण मोहिमेला गती दिली जात आहे.

गेल्या आठवड्याभरापासून म्हणजेच २१ जूनपासून देशात १८ ते ४४ या वयोगटासाठी देखील केंद्र सरकारकडून मोफत लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी ८३ लाख नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे गेल्या आठवड्याभरात लसीकरणाचा वेग वाढला असून आजच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतानं डोसच्या संख्येमध्ये अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार भारतात काल २८ जून २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ३२ कोटी ३६ लाख ६३ हजार २९७ लसीचे डोस देण्यात आले आहेत.

error: Content is protected !!