बीड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कठोर पर्याय लागू करण्यात आला. यामुळे कोरोना तर आटोक्यात आला परंतु धंद्यातील नुकसान, नोकरी गेल्याने अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. यापैकी काही जण नैराश्यातून मृत्यूला जवळ करू लागले आहेत. याच नैराश्यातून बीड जिल्ह्यातील नेकनूर व चौसाळ्यात दोन जणांनी गळफास घेत आत्महत्या केली.
बीड तालुक्यातील चौसाळा येथील कापड व्यापारी गिरीष गणेश शिंदे (वय ३९) धंद्यासाठी कर्ज घेतलेेले होते. मात्र, लॉकडाऊन लागल्याने त्यांचा व्यवसाय बंद राहिला. त्यामुळे कर्जाची परतफेड वेळेवर करण्याची चिंता त्यांना होती. यातूनच ते नैराश्यात होते. मंगळवारी रात्री जेवणानंतर ते दुकानाच्या वर असलेल्या आपल्या घरात दुसऱ्या मजल्यावर झोपले होते मध्यरात्री त्यांनी दरवाजाच्या कडीला दोरी व टॉवेलच्या सहायाने गळफास घेतला. पहाटे २ वाजता गणेश यांच्या आईला जाग आल्यानंतर हा प्रकार समोर आला. नेकनूर पोलिसांत अकस्मिक मृत्यूची नोंद केली गेली आहे.
दुसरा प्रकार मंगळवारी रात्री नेकनूरमध्ये घडला. बाजीराव सुदाम पांचाळ (वय ३१) यांनी घरातल्या आडूला गळफास घेत आत्महत्या केली. बाजीराव हे पुण्यात एका कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होते मात्र लॉकडाऊनमध्ये त्यांची नोकरी गेली. काही महिन्यांपूर्वी ते गावी आले मात्र हाताला काहीच काम मिळाले नाही. बेरोजगारीमुळे ते चिंतेत होते.कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर होता. यातूनच त्यांनी मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. या प्रकरणीही नेकनूर पोलिसांत अकस्मिक मृत्यूची नोंद केली गेली आहे. २४ तासांत नेकनूर परिसरात दोन जणांनी लॉकडाऊनमुळे आत्महत्या केली.