आता काशी, मथुरा विसरा; मोदींचा संघाला स्पष्ट संदेश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सन १९४९ पासून ज्यासाठी अथक परिश्रम केले ते अयोध्येत रामजन्मभूमीच्या जागी श्रीरामांचे भव्य मंदिर उभारण्याचे स्वप्न साकार होत असल्याने पंतप्रधान मोदी यांनी, आता काशी व मथुरेचा शिल्लक राहिलेला वादग्रस्त विषय लावून धरू नका, असा स्पष्ट संदेश संघाच्या नेत्यांना दिला आहे. त्याऐवजी भगवान रामाची लाट जगभर पोहोचवण्यावर भर द्यावा, असे मोदींना वाटते. काही संत व संघातील कट्टरपंथी मथुरा व काशी पुन्हा हिंदूंनी ताब्यात घेण्यावर आग्रही आहेत. पण आता अयोध्या हाती आल्याने तिचाच जागतिक दर्जाचे धार्मिक स्थळ म्हणून विकास करण्यावर मोदींचा भर आहे.

अयोध्येच्या बाबतीत मुस्लीमही सोबत यावेत यासाठी मोदींनी नाना तऱ्हेने भरपूर प्रयत्न केले आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर देशात कुठेही गडबड होणार नाही, याची शाश्वती केली. इतर वादग्रस्त विषय हाती घेऊन या कमावलेल्या सदिच्छा गमावण्याची मोदींची इच्छा नाही. माहीतगारांच्या सांगण्यानुसार मे २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यापासून अयोध्येतील राम मंदिराच्या विषयात मोदींनी प्रत्येक टप्प्याला अत्यंत जाणीवपूर्वक लक्ष घातले. अयोध्येतील मंदिर उभारणी हा मोदींच्या आयुष्यातील फार मोलाचा टप्पा आहे. जे शक्य वाटत नव्हते ते त्यांनी शक्य करून दाखवले आहे. त्यामुळे देशातील सांप्रदायिक सलोखा टिकून राहावा यासाठी नेहमीपेक्षा अधिक काही करावे लागले तरी ते करण्याची मोदींची तयारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!