नवी दिल्ली, 12 जून: केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच (Reshuffle in Union cabinet) फेरबदल होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेला पराभव आणि आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा फेरबदल होणार असल्याचं बोललं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी शुक्रवारी रात्री गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (BJP president J P Nadda) यांच्यासोबत बैठक केली. तसंच मोदींनी काही मंत्र्यांशी वैयक्तिक चर्चा सुरू केली असून त्यांच्या कामकाजाचा आढावाही घेतला. दरम्यान या फेरबदलात खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे (Dr. Pritam Munde Member of the Lok Sabha) यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर तसंच नरेंद्र तोमर यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांवर दोन ते तीन मंत्रालयांची जबाबदारी आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळाच्या फेरबदलात या मंत्र्यांवरील ताण कमी करण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आठवड्याभरात हा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यात ईसकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र राज्यातून डॉ. प्रीतमताई मुंडे यांचंही नाव आघाडीवर आहे.
प्रीतमताईंच्या कामाची दखल
डॉ. प्रीतमताई मुंडे या सध्या बीडच्या खासदार आहेत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या द्वितीय कन्या आहेत. तसंच पंकजाताई मुंडे यांच्या लहान बहिण आहेत. प्रीतमताईंनी यांनी 2014 ची लोकसभा पोटनिवडणूक लढवली. ही निवडणूक त्या तब्बल सहा लाख 96 हजार 321 मतांच्या फरकाने जिंकल्या होत्या. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत त्यांचा लीड कमी झाला. तरीही प्रीतम मुंढे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा 1 लाख 68 हजार मतांच्या फरकानं पराभव केला होता. प्रीतमताईंच्या कामाची दखल घेऊन त्याच्यावर मंत्रिमंडळात नवी जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
केेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने या मंत्रिमंडळात नव्या चेहर्यांना संधी देण्यात येणार असल्याचे बोलले जाते. बीड जिल्हा हा राजकीदृष्ट्या संवेदनशील असून राज्याच्या राजकारणात या जिल्ह्याचा दबदबा आहे. केंद्रीयस्तरावर स्व. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्या कार्यकाळात जिल्ह्याचा दबदबा कायम होता. गेल्या सात दशकामध्ये बीड जिल्ह्यात केंद्रीय मंत्रिमंडळात केवळ तीन लोकांना स्थान मिळाले आहे. यामध्ये बबनराव ढाकणे, जयसिंगराव गायकवाड आणि स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा समावेश आहे. त्यानंतर आता खा. प्रितम मुंडे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.केेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान