कोल्हापूर | काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली होती. तसेच त्यांनी आगामी निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचीही घोषणा केली होती. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आपला पक्ष वाढावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली असेल तर स्वप्न पाहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण शेवटी पक्षाचे प्रमुख म्हणून जे व्यक्ती आहेत. ते याबाबत निर्णय घेत असतात, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. कोल्हापूरमध्ये कोरोनाचा आढावा घेण्यासाठी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
तसेच कोणत्या पक्षाशी आघाडी करून निवडणूका लढवायच्या, की स्वबळावर लढायच्या हा अधिकार काँग्रेसमध्ये सोनिया गांधी यांना आहे. तसाच राष्ट्रवादीत शरद पवार आणि शिवसेनेत उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे मी यावर मत व्यक्त करणं योग्य नसल्याचंही अजित पवारांनी म्हटलं.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अजूनही कोरोना रूग्णांची संख्या दररोज वाढतच चालली आहे. कोल्हापूरमध्ये नियमांचं पालन केलं जात नसेल, तर कोल्हापूरातील निर्बंध अधिक कडक करणार असल्याचा सूचक इशारा अजित पवार यांनी दिला आहे. त्याचबरोबर निर्बंध कडक करायची हौस आम्हाला नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.