वारकऱ्यांच्या केसाला धक्का लागला तर गाठ आमच्याशी

Corona Pandharpur Warkarais rules

मुंबई | कोरोनामुळे यंदाही वारीसाठी केवळ 10 पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय घेतला आहे. पालखीसोबत जाणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या नियमांचं पालन करणं सर्वांना बंधनकारक आहे. तर देहू-आळंदी पालखीबरोबर 100 जणांना जाण्यास परवानगी देण्यात आली. मात्र सरकारचे वारीबाबतचे निर्णय मान्य नसल्याचं म्हणत यावर फेरविचार करावा, अशी मागणी भाजपप्रणित अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी केली आहे. वारीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय वारकऱ्यांना मान्य नाही. सरकारने हा निर्णय तातडीने बदलावा. अन्यथा रस्त्यावर असंख्य पालख्या उतरतील, असा इशारा तुषार भोसले यांनी दिला आहे.

मी स्वत: यंदा पायी पंढरपूरला जाणार आहे. वारकरी रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ भाजपशी आहे, असं तुषार भोसले म्हणाले.  वारकरी रस्त्यावर उतरल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तर यालाही अजित पवार जबाबदार असतील असं तुषार भोसले म्हणाले.

दरम्यान,वारीला पायी जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. पालखी पायी गेल्यास लोक उत्साहाच्या भरात पालखीभोवती गर्दी करतील. त्यामुळे कोरोना नियमांचा भंग होऊ शकतो. कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळेच पायी जाण्यास परवानगी देण्यात आली नाही, असं अजित पवारांनी सांगितलं होतं. आता यावर अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

error: Content is protected !!