पतीची प्रकृती चिंताजनक
(27 May) – केक कापतानाचे फोटो समाजमाध्यमावर टाकण्याच्या कारणावरून पतीपत्नीवर ब्लेडने वार करून एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शिर्डीत घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विठ्ठल मधुकर भाटे (वय ३९, धंदा नोकरी) पत्नी रुपाली (वय ३०), दोन मुली व एका मुलगा हे कुटुंब शिर्डी येथे राहतात. दरम्यान दि.२५ मे रोजी रुपाली यांचा वाढदिवस होता. यानिमित्त त्यांचा मानलेला भाऊ पवन ऊर्फ गणेश पुनमसिंग परदेशी (वय २४, राहणार सावळीविहीर) हा घरी आलेला होता.रात्री आठ वाजेच्या सुमारास विठ्ठल भाटे यांनी केक कापायचा असून ते फोटो फेसबुकवर टाकु, असे म्हणताच पवन याने केक फेकून देत तुम्हाला दाखवतो,
अशी धमकी देऊन धारदार ब्लेडने रूपाली यांच्या गळ्यावर वार करून विठ्ठल भाटे यांच्यावरदेखील हल्ला केला व स्वत:देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भाटे यांच्या तक्रारीवरून शिर्डी पोलिसांनी परदेशी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विठ्ठल भाटे यांच्यावर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. रुपाली भाटे व परदेशी यांच्यावर साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.