उरलेले सामने युएईमध्ये UAE खेळवण्यात येणार
(25 May)- कोरोनामुळे अर्ध्यात स्थगित झालेल्या आयपीएलचे उरलेले सामने युएईमध्ये खेळवण्यात येणार असल्याचं वृत्त आहे. सुरुवातीला उरलेली आयपीएल इंग्लंडमध्ये होईल, असं सांगितलं जात होतं. स्पोर्ट्स टुडेने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलच्या सामन्यांना 19 किंवा 20 सप्टेंबरला युएईमध्ये सुरुवात होईल, तर फायनल मॅच 10 ऑक्टोबरला होईल. तसंच यावेळी 10 डबल हेडर म्हणजेच 10 दिवस प्रत्येक दिवशी दोन सामने होतील. बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड ECB यांच्यात टेस्ट सीरिजचं वेळापत्रक बदलण्याबाबत किंवा शेवटची टेस्ट रद्द करण्याबाबतही चर्चा झाल्याचं बोललं जात होतं, पण दोन्ही बोर्डांमध्ये सहमती होत नसल्यामुळे बीसीसीआयने आयपीएलचे उरलेले सामने युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला.
कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचा 2020 सालचा मोसमही युएईमध्ये आयोजित करण्यात आला होता, त्यावेळीही भारतात कोरोनाचे बरेच रुग्ण होते. यावेळी मात्र भारतात आयपीएल आयोजित करण्यात आली, पण खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्यामुळे स्पर्धा 29 मॅचनंतर स्थगित करण्यात आली. आयपीएल रद्द केली तर बोर्डाला 2,500 कोटींचं नुकसान होईल, असं बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले होते. त्यामुळे बीसीसीआय आयपीएलचे उरलेले सामने आयोजित करण्यासाठी आग्रही आहे. लवकरच याचं वेळापत्रकही समोर येईल.