मुंबई | मुंबईमध्ये टॅक्सीचालक अनेक वेळा भाडे नाकारत असल्याच्या घटना घडत असतात. प्रत्येक मुंबईकरांना या नकाराला कधी ना कधी सामोरं जावं लागतं. अशीच एक घटना दादर मार्केटमध्ये आज घडली आहे. टॅक्सीचालक छबिलाल जैस्वर यांनी दादरमधील एका फळविक्रेत्याचं भाडं नाकारलं.
फळविक्रेता आरोपी बसवराज मेलिणामनी याला टॅक्सी चालकानी भाडं नाकारल्याचा राग आल्याने त्याने छबिलाल यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. हा वाद हळूहळू पेटत गेला आणि बाजूलाच असलेला पेव्हर ब्लॉक या आरोपीने छबिलाल यांच्या डोक्यात टाकला. या घटनेदरम्यान टॅक्सीचालक छबिलाल यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, दादरच्या गजबजलेल्या कबुतरखाना परिसरात सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरोपी बसवराज याने छबिलाल यांना जवळच जायचं असल्याचं सांगितलं. पण जवळच भाडं असल्याने छबिलाल यांनी भाडं नाकारलं. आरोपी हा त्याच भागामध्ये राहत असल्याने तो टॅक्सी चालकावर दादागिरी करू लागला.
दोघांचा वाद हळूहळू वाढत गेला आणि रागाच्याभरात बसवराज याने जवळचा सिमेंट पेव्हर ब्लॉक उचलून टॅक्सी चालकाच्या डोक्यात घातला आणि त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेत सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी बसवराजला अटक केली आहे. दिवसाढवळ्या एका शुल्लक भांडणातून झालेल्या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे