जालना शहरातील जिल्हा परिषद क्वॉर्टर परिसरात अतिक्रमण काढत असताना एका महिलेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी घडली. ज्योती शांतीलाल खंदारे असे जखमी महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, खंदारे कुटुंबाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
जिल्हा परिषद क्वॉर्टर परिसरात सदरील महिला तीस वर्षांपासून राहत आहे. सीईओ यांच्या आदेशाने हे अतिक्रमण काढण्यासाठी पोलिस त्या ठिकाणी गेले होते. अतिक्रमण काढण्यास सदरील महिलेने विरोध करून घरातील विष प्राशन करून अंगणातच आत्महत्या करण्याचा प्रयत केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, या ठिकाणी निमा अरोरा यांच्यासह पोलिस उपस्थित होते. दरम्यान, महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पीआय कोठाळे, कैलास जावळे आदींची उपस्थिती होती. याप्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.