चालकाविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
भरधाव वाळुच्या टिप्परच्या चाकाखाली चिरडून दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले. ही विचीत्र दुर्घटना जालना येथील जाफराबाद तालुक्यातील चिंचखेडा पाटीजवळ मंगळवारी (दि. १८) दुपारी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. मयत पती-पत्नीचे नांव राजु शुकालाल पवार (वय ४०) सौ. शोभा राजु पवार (वय ३५) रा. दत्तपुर ता. सिंदखेडराजा जि. बुलडाणा असे आहेत. वरिल विषयी वृत्त असे की, जाफराबाद येथून माहोरा मार्गे सिल्लोडला राजु पवार व त्याची पत्नी सौ. शोभा हे दोघे दुचाकीवरून जात असतांना चिंचखेडा पाटीजवळ अवैध वाळु घेवून जाणार्या टिप्परने (क्र.क्र. एम. एच. ०६.बी. डी. ९८८९ ) दुचाकीला धडक दिली. यामध्ये राजु पवार व सौ. शोभा या टिप्परच्या चाकाखाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जाफराबाद पोलिसांनी मयत राजु पवार व त्याची पत्नी शोभा यांचे शव विच्छेदनासाठी जाफराबाद ग्रामीण रुग्णालयात पाठविले. याबाबत टिप्पर चालकाविरोधात जाफराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास जमादार सहाने करीत आहेत.