नवी दिल्ली | देशभरात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पण गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात असल्याचे चित्र पाहायला मिळत असलं तरी मृत्यूदर हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आयसीएमआरने कोरोना रुग्णाच्या उपचारावरील प्लाझ्मा थेरपी बंद करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला.
भारतामध्ये कोरोना रुग्णांवर सुरु असलेल्या उपचारांमध्ये रेमडेसिविर या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू असल्याचं दिसून येत आहे. या इंजेक्शनचा काळाबाजारही गेल्या काही दिवसांपासून होत असल्याचं उघड झालं आहे. पण हे इंजेक्शन शारीरिकदृष्ट्या दुष्परिणाम देऊ शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात.
रेमडेसिविर हे इंजेक्शन कोरोना रुग्णांच्या शरीरावर जास्त प्रभावी नसून त्याचे दुष्परिणाम जास्त असल्याने कोरोना रुग्णावर होत असलेल्या उपचारांमधून रेमडेसिविर हे इंजेक्शन काढून टाकण्यावर विचार सुरू असल्याचं दिल्ली येथील सर गंगाराम रुग्णालयातील डॉ. डी एस राणा यांनी मंगळवारी बोलताना सांगितलं.
आधी प्लाझ्मा थेरपी बंद केली त्यानंतर आता रेमडेसिविर इंजेक्शन कोरोना उपचारातुन हद्दपार होण्याच्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता आयसीएमआर नेमका यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.