INS त्रिखंड लवकरच ऑक्सिजन घेऊन पोहोचणार मुंबईत

मुंबई: आखाती देशांमधून 54 टन द्रवरूप ऑक्सिजन घेऊन निघालेली भारतीय युद्धनौका आयएनएस त्रिखंड (INS Trikhand) सोमवारी सकाळी मुंबई बंदरात (mumbai) दाखल होणार आहे. देशातील कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने हवाईदलाने तसेच नौदलाने आपल्या युद्धनौका व मालवाहू विमानांचा वापर कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी सुरु केला आहे. मालवाहू विमाने इंग्लंड ते जर्मनीपासून तर युद्धनौका आखाती देशांपासून ते सिंगापूरहून ऑक्सिजनचे (oxygen)कंटेनर व अन्य वैद्यकीय सामुग्री भारतात आणत आहेत. त्याचा मोठा उपयोग कोरोना रुग्णांना होत आहे. (INS Trikhand will soon reach to mumbai with oxygen)

त्रिखंड युद्धनौकेने दोहा व कतार येथून ऑक्सिजनचे कंटेनर, सिलेंडर व अन्य वैद्यकीय सामुग्री घेतली असून ती उद्या सकाळी मुंबईच्या नौदल गोदीत येईल. तेथून ते कंटेनर उतरवून गरज असलेल्या रुग्णालयांमध्ये पाठवले जातील. त्याखेरीज आयएनएस कोची आणि तबर या युद्धनौका देखील सोमवारी किंवा मंगळवारी मुंबई किंवा मुंद्रा बंदरात दाखल होतील. त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन व अन्य वैद्यकीय सामुग्री आहे. अन्य युद्धनौकाही ऑक्सिजन आणि वैद्यकीय सामुग्री आणण्याच्या मोहिमेवर आहेत.

आतापर्यंत हवाईदलाच्या सी 17 प्रकारच्या मालवाहू विमानांनी देशात 400 उड्डाणे करून गरज असलेल्या शहरांमध्ये सुमारे पाच हजार टन ऑक्सिजन (251 टँकर) पोहोचविला आहे. या विमानांनी परदेशातही (सिंगापूर, दुबई, बँकॉक, इंग्लंड, जर्मनी, बेल्जिअम, ऑस्ट्रेलिया) 59 उड्डाणे करून 1,233 मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजन भारतात आणला. तर आयएल 76 प्रकारच्या मोठ्या मालवाहू विमानांनीही इस्रायल व सिंगापूरहून ऑक्सिजन जनरेटर, व्हेंटिलेटर आणले आहेत.

error: Content is protected !!