जिजाऊ कोविड सेंटरची करण्यात आली स्थापना
शहराजवळील वासनवाडी फाटा येथे जिजाऊ माँसाहेब पब्लिक स्कूलमध्ये आण्णासाहेब पाटील प्रतिष्ठानच्या वतीने जिजाऊ कोविड सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. बुधवारी (दि.५) सकाळी ११ वाजता विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस व प्रवीण दरेकर, नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीत रुग्णसेवेला प्रारंभ होणार असल्याची माहिती आ. विनायक मेटे यांनी दिली.यावेळी जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, बबन शिंदे, रामहरी मेटे उपस्थित होते.
शाळेची दुमजली इमारत कोविड सेंटरसाठी संस्था संचालक बबन शिंदे यांनी उपलब्ध करुन देत सामाजिक भान जपल्याचे आ. मेटे यांनी सांगितले. दोनशे रुग्णांच्या निवास, भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सौम्य लक्षणे व गृहविलगीकरणातील रुग्णांच्या मदतीला तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित परिचारिका, आरोग्य कर्मचारी व वॉर्डबॉय राहतील. एक रुग्णवाहिका तसेच पाच ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली आहे.रुग्णांना आहर तज्ज्ञांच्या सल्ल्याने चहा, नाष्ता, जेवण , काढा तसेच हळदीयुक्त दूध दिले जाणार आहे.याकामी संतोष तापडिया,सीए भानुदास जाधव,ॲड.मंगेश पोकळे,संजय पवार यांचे योगदान लाभत असल्याचे आ. मेटे यांनी सांगितले.