पोलिसांनी केला बळाचा वापर
बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संक्रमण प्रचंड वाढत आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोनाचा संभाव्य धोका टळतो या गोष्टीवर आता नागरिकांना विश्वास बसला आहे. कालच बीड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. लस घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असून आज बीडच्या जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी मोठया प्रमाणावर लोकांनी गर्दी केली.
सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. या वेळी उपस्थित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी गर्दी करू नका, सोशल डिस्टन्स पाळा’, असे सांगितले मात्र लोक ऐकत नसल्याचे पाहून आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यानंतर घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसह डीवायएसपी वाळके हे घटनास्थळी आले.
लोकांना गर्दी करू नका, असे आवाहन केले परंतु लोक ऐकत नसल्याचे पाहून पोलीसांनी बळाचा वापर करत सौम्य लाठीमार केला. या वेळी डीवायएसपी वाळकेंना धक्काबुक्की झाल्याचे समजते. या प्रकरणात बीड शहर पोलीसांनी पाच ते सहा जणांना ताब्यात घेतल्याचेही सांगण्यात येते.