हवेतून जमिनीवर या- सदाभाऊ खोत
सांगली: सांगली जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. रेमडेसिवीर मिळत नाही. ऑक्सिजनही मिळत नाही. प्रशासन मात्र जनतेची दिशाभूल करताना दिसत आहे. ऑक्सिजन नसल्याने चार रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. तरीही मंत्री म्हणतात जिल्ह्यात कशाचीच कमतरता नाही. मंत्र्यांनो, खोटी माहिती देऊन हवेत गोळीबार करू नका. हवेतून जमिनीवर या, असं आवाहन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.
सदाभाऊ खोत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा हल्लाबोल केला आहे. सहा महिन्यांपूर्वीच आम्ही ऑक्सिजन प्लांट उभा करा म्हणून सांगितलं होतं. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. सांगली जिल्हा कोरोनाची स्मशानभूमी होत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा गुजरातमधून येणार होता. हा साठा आला असता तर रुग्णांना इंजेक्शन मिळाले असते. पण त्या उद्योजकाला रात्रीच उचलून धमकावल्या गेलं. या प्रकारामुळे उद्योजकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तुम्ही उद्योजकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण कराल तर राज्यातील उद्योजक राज्याबाहेर जातील, अशी भीती व्यक्त करतानाच या सरकारने राज्यात ठोकशाही सुरू केल्याचा आरोपही खोत यांनी केला.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. माझा पुतण्या माझ्या जवळ बसून होता, असं भुजबळ म्हणाले. राजकारणात टीका टिप्पणी होत असते. विरोधक चुका दाखवण्याचं काम करत असतात. याचे भान ठेवायला हवे. लोकप्रतिनिधी हतबल आहेत. सत्ताधाऱ्यांना सवाल नाही करणार तर कुणाला करणार?, असा सवाल करतानाच भुजबळ जेलमध्ये होते. तेव्हा ते चेअरमध्ये होते. आता घरी बसले आहेत, असंही ते म्हणाले
पढंरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निकालावरही त्यांनी भाष्य केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अचूक व्यूहरचना केली. आमदार दिला तर येथील विकासकामे माझ्यावर सोडा असं ते म्हणाले होते. माझा आमदार निवडून दिला तर सरकारमधून कशी कामं करून घ्यायची हे मला माहीत आहे, असंही फडणवीसांनी सांगितलं होतं. त्यामुळे मतदारांनी त्यांच्या हाकेला प्रतिसाद दिला, असंही त्यांनी सांगितलं.