आपल्या देशाला अडचणीत आणून इतर देशांना लस देणे योग्य नव्हते- मालिक
देशातील वाढत्या कोरोनाच्या संकटावरून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. आपल्या देशाला अडचणीत आणून इतर देशांना लस देणे योग्य नव्हते. याचा अर्थ स्पष्ट आहे की, कुठलंही नियोजन नाही. नुसती माझी पब्लिसिटी होईल यासाठीच मी काम करणार ही कार्यपध्दत योग्य नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही टीका केली आहे. निवडणूकांसाठी व भावनेच्या राजकारणासाठी ही सगळी परिस्थिती देशात निर्माण करण्यात आली आहे. लसीचे उत्पादन आपल्याकडे कमी असताना इतर देशांना लस देण्यात आली असा आरोपही मलिक यांनी केला आहे.
आता हे सगळं सोडून देशामध्ये जे कोरोनाचे संकट आहे. या आरोग्य आणीबाणीत केंद्राने सर्वपक्षीय बैठक बोलवावी त्यांची एकजूट करावी आणि त्याच्यातून निश्चित धोरण तयार करून कोरोनावर मात देता येईल असा कार्यक्रम तयार करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
निवडणुकांच्या काळात भाजपने कोरोना रोखण्यासाठी काहीच पावलं उचलली नाहीत. उलट लॉकडाऊन करू नका असंच भाजपने सांगितलं होतं. आता कोविड टास्क फोर्स आणि सर्वोच्च न्यायालयानेही त्यावरून सवाल केला आहे. देशात लसीचा तुटवडा आहे. देशात लस केंद्राला वेगळ्या दराने आणि राज्यांना वेगळा दराने विकली जात आहे. एकाच देशात एकच कंपनी एकच लस तीन वेगवेगळ्या दरांना कशी विकते? असा सवाल करतानाच कोर्टाची कारवाई सुरूच राहील. पण देशाला आपण कुठे घेऊन चाललो आहे. याकडे मोदींनी लक्ष द्यावे, असं आवाहनही त्यांनी केलं.