आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला केले पाचारण
केज :- गेल्या तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. काल दुपारी केज तालुक्यात पाऊस झाला. यामध्ये चंदनगाव शिवारातील एका घरावर वीज पडल्याने कडब्याच्या गंजीने पेट घेतला. त्यात परिसरातील इतर वस्तूही जळाल्या. शेतातील गहू, हरभरा, मोटारसायकलही जळून खाक झाले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. सुदैवाने यात शेतकरी बालंबाल बचावला.
तुकाराम साहेबराव तपसे (रा. चंदनसावरगाव) यांच्या शेतातील घरावर काल दुपारी वीज पडली. त्यामुळे गंज पेटली. गंजीमुळे इतर सर्वच परिसर पेटत गेला. यात सोयाबीन, हरभरा, गहू, पाईप, कडब्याची गंज, मोटारसायकल इत्यादी जळून खाक झाले. तपसे यांच्या शेतामध्ये आग लागल्याची माहिती परिसरातील नागरिकांना झाल्यानंतर त्यांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून अग्निशमनदलाला पाचारण करण्यात आले. सुदैवाने या आगीत शेतकरी बालंबाल बचावला. मात्र शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.