सीबीआयने दाखल केला एफआयआर
(२४ एप्रिल) – सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी वसुलीच्या आरोपांवरून एफआयआर दाखल केला आहे. यासोबतच देशमुख यांच्या मुंबईतील सरकारी बंगल्यासह अनेक ठिकाणी छापेमारी केली. यापूर्वी सीबीआयने देशमुख यांची 11 तास चौकशी केली होती. त्यासोबतच संबंधित प्रकरणात देशमुख यांचे दोन स्वीय्य सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांचीदेखील 10 तास चौकशी करण्यात आली होती.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी केल्यानंतर त्यांनी तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांच्यावर महिन्याला 100 कोटी वसुलीचा आरोप केला होता. सिंह यांनी आरोपांची सखोल चौकशी व्हावी याकरीता सर्वोच्च न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित प्रकरणाची सुनावणी करत सीबीआयला 15 दिवसांच्या आत रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काही वेळातच देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री ठाकरे यांच्याजवळ सोपवला होता. त्यानंतर आता सीबीआयने माजी गृहमंत्र्यांविरुद्ध एफआयआर देखील दाखल केला आहे.