नवी दिल्ली : देशाच्या ऐतिहासिक अशा अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपुजनचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह काही मोजकेच पाहूणे या कार्यक्रमला उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर योगी आदित्यनाथ यांनी अन्य मुद्द्यांवरही मोकळेपणाने चर्चा केली. यावेळी मशिदीच्या कार्यक्रमासाठी जाणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मला कोणी बोलावणारही नाही आणि मी जाणारही नाही. जर मी त्या ठिकाणी गेलो तर अनेकांच्या दुकानांना टाळं लागेल, असे उत्तर त्यांनी या प्रश्नाला दिले. यावरून आता विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. योगी आदित्यनाथ यांनी माफी मागावी अशी मागणी समाजवादी पक्षाकडून करण्यात आली आहे.
या प्रकारचं वक्तव्य करून योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदासाठी घेतलेल्या शपथेचं उल्लंघन केलं आहे. ते केवळ हिंदूंचे नाही तर संपूर्ण राज्याचे मुख्यमंत्री आहेत. राज्यात हिंदू आणि मुस्लिमांची जेवढीही लोकसंख्या असेल तेवढ्या लोकसंख्येचे ते मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे प्रवक्ते पवन पांडेय यांनी केली.