आशा सेविकांच्या संपावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला
देशात करोनामुळे गंभीर स्थिती उद्भवलेली असतानाच आशा सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलं आहे. देशातील ६ लाख आशा सेविकांनी संप पुकारला आहे. याच मुद्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा मोदी सरकारला सुनावलं आहे. “सरकार आधी मुकं तर होतंच, कदाचित आता दृष्टिहीन आणि बहिरंही झालं आहे,” असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.
देशात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. विशेष आरोग्य सेवेतील कर्मचारी ताणावाखाली असल्याचंही दिसत आहे. करोनाचा संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून अधिकाधिक चाचण्या करण्याचं काम सुरू आहे. यासाठी आशा सेविकांची मदत घेतली जात आहे. मात्र, आता आशा सेविकांनी संप पुकारला आहे. आशा सेविकांच्या संपावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “देशातील प्रत्येक घरापर्यंत आशा सेविका आरोग्य सुरक्षा पोहोचवतात. खऱ्या अर्थानं त्या आरोग्य योद्धा आहेत, पण आज स्वतःच्या हक्कासाठी संप करण्यासाठी मजबूर झाल्या आहेत. सरकार मुकं तर होतंच, कदाचित आता दृष्टिहीन आणि बहिरंही झालंय,” अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं.
देशभरातील सहा लाख आशा सेविकांनी संप पुकारला आहे. सन्मानजनक आणि वेळेवर वेतन मिळावं, त्याचबरोबर वेतन निश्चित करण्यात यावं यासह इतर मागण्यांसाठी आशा सेविकांनी संप पुकारला आहे. आशा सेविकांशी संबंधित असलेल्या संघटनांनी अशीही मागणी केली आहे की, “आशा सेविकांना विमा व आपत्ती भत्ता आदी सुविधाही सरकारनं द्याव्यात.”