6 वर्षीय मुलाच्या हत्येचा उलगडा, करणी करुन म्हशीला मारल्याच्या संशयातून खून

बीड : बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलाच्या हत्येचा पोलिसांनी बारा तासात छडा लावत आरोपींना अटक केली आहे. करणी करुन म्हशीला मारल्याच्या संशयातून बदला घेण्यासाठी एका दाम्पत्याने या सहा वर्षीय चिमुकल्याची गळा आवळून हत्या केली. या प्रकरणी पती-पत्नीला अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

बहिणीसोबत शाळेत खेळण्यासाठी गेलेल्या सहा वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. बीड जिल्ह्यातील रत्नागिरी गावात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाच्या अवघ्या 12 तासात बीड पोलिसांनी छडा लावत आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपी पती पत्नी हे मृत मुलाच्या भावकीतलेच असल्याचं समोर आलं आहे.

नेकनूरपासून जवळ असलेल्या रत्नागिरी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात काल (4 फेब्रुवारी) शुभम सपकाळ या सहा वर्षीय बालकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती . या प्रकरणी कुटुंबियांनी घातपाताचा आरोप केला होता. त्या बालकाचा गळा आवळून खून करण्यात आल्याचं काल रात्री उशिरा अहवालातून निष्पन्न झालं होतं.

नेकनूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक गतीने करत सपकाळ यांच्या भावकीतील रोहिदास नवनाथ सपकाळ आणि देवईबाई रोहिदास सपकाळ या दाम्पत्याला ताब्यात घेतले. करणी करुन म्हशीला मारल्याच्या संशयातून त्या बालकाचा खून केल्याचं या दाम्पत्याने सांगितलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी ही माहिती दिली. आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

error: Content is protected !!