वै.वामनभाऊंची पुण्यतिथी साध्या पध्दतीने साजरी करा-महंत विठ्ठल महाराज

बीड दि.3 (प्रतिनिधी): वारकरी सांप्रदायातील थोर संत वै.ह.भ.प. वामनभाऊ महाराज यांची सालाबादाप्रमाणे याही वर्षी गहिनीनाथ गडावर शुक्रवार दिनांक 5 फेब्रुवारी 2021 रोजी वै. वामनभाऊंचा पुण्यतिथी सोहळा करोनाच्या पार्श्‍वभूमीवर अगदी साध्या पध्दतीने साजरा केला जाणार आहे. भाविकांनी गर्दी न करता संतश्रेेष्ठ वै.वामनभाऊंची पुण्यतिथी साजरी करावी, असे आवाहन गहिनाथगडाचे मठाधिपती ह.भ.प.विठ्ठल महाराज यांनी केले आहे.
यासंदर्भात महंत विठ्ठल महाराज यांनी म्हटले आहे की, सध्या जगभरातील करोनाची महामारी अद्यापही सैल न झाल्यामुळे अगदी मोठ्या उत्साहात वाजत गाजत साजरी होणारी वामनभाऊंची पुण्यतिथी प्रथमच अगदी साध्या पध्दतीने साजरी करण्यात येणार आहे. प्रात:समयी वै.ह.भ.प. वामनभाऊंच्या समाधीची महापूजा होणार आहे.
पुण्यतिथी कार्यक्रम साध्या पध्दतीने कोरानाचे नियम पाळुन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची गर्दी भाविकांनी करू नये, तसेच 60 वर्षाच्या पुढील व्यक्ती, लहान मुले, तसेच आजारी व्यक्तींनी घरातच भाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून पुण्यतिथी साजरी करत गडावर येण्याचे टाळावे. तसेच गहिंनाथगडावर गर्दी न करता इत्तर भक्तांनी सॅनिटायझर, मास्कचा वापर करूनच गडावर भाऊंच्या पुण्यतिथीस यावे. यावेळी कीर्तन, महाप्रसाद तसेच इत्तर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले असून येणार्‍या भाविकांना बंद पाकीटातील प्रसादाचे वाटप करण्यात येणार असून भाविकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन महंत विठ्ठल महाराज यांनी केले आहे.

error: Content is protected !!