प्रत्येक लग्नाचे मिळायचे 10 हजार रुपये ; 8 महिन्यांत 6 जणांशी केलं लग्न

रतलाम (मध्य प्रदेश), 08 ऑगस्ट : लग्न म्हटलं एका पवित्र नात्याची सुरुवात असते. दोन घरांना एकत्र जोडणारं आणि संपूर्ण आयुष्य आपल्याला साथ देणारं नातं म्हणजे लग्न. पण याच पवित्र नात्याशी खूनी खेळ खेळल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रतलाममध्ये राहणाऱ्या एका नवरदेवाने अशा मुलीशी लग्न केली जीची ओळख एक ‘लुटेरी दुल्हन’ म्हणून आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.

घटना अशी की, लग्नानंतर दोन दिवसांनी वधूने घरी जाण्याचा आग्रह धरला तर नवरदेवही तिच्याबरोबर निघाला. पण सासरी जाताना काहीतरी गडबड असल्याचं नवरदेवाच्या लक्षात आलं पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. नवरदेवाच्या हत्येचा आधीच प्लान केला गेला होता. दुसर्‍या दिवशी लोकांना नवरदेवाचा मृतदेह झाडावर लटकलेला आढळला. त्यानंतर नवरदेवाने दरोडेखोर मुलीशी लग्न केलं होतं असं धक्कादायक सत्य समोर आलं.

7 दिवसांपूर्वी रतलाम जिल्ह्यातील सैलानाजवळ एका युवकाचा मृतदेह सापडल्याच्या प्रकरणात पोलिसांनी दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. यापूर्वी आरोपी नवरीने राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या अनेक भागात खोटा विवाह करून कुटुंबियांना लुटलं असल्याचं समोर आलं आहे.

सैलाना इथं महेंद्र मोतीलाल कलाल (29) याचा मृतदेह 7 दिवसांपूर्वी सापडला होता. सुरुवातीच्या तपासात असं आढळून आलं की, या युवकाची हत्या त्याची पत्नी मीनाक्षीने केली होती. महेंद्रचं दोन दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. पण त्याच्या हत्येनंतर आरोपी पत्नी मीनाक्षी तिच्या टोळीसह फरार असल्याची माहिती पोलिसांच्या कानावर पडली आणि तपासाला सुरुवात झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅरेज ब्युरोमार्फत महेंद्र आणि मीनाक्षीचा विवाह झाला होता. लग्नासाठी मीनाक्षीच्या खोट्या भावाने अडीच लाख रुपये घेतले होते, त्यानंतर न्यायालय आणि कुटूंबाच्या संमतीने दोघांनी लग्न केले. लग्नाच्या दोनच दिवसानंतर, मीनाक्षीचे नातेवाईक म्हणून आलेल्या चार जणांनी महेंद्रला त्यांच्या गाडीत बसवलं आणि हत्येचा कट आखला.

दुसऱ्या दिवशी महेंद्रचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांना संशयाची सुई दिसली आणि तसा तपास सुरू झाला. पोलिसांनी तपास करत आरोपी तरुणीचा शोध घेतला आणि तिच्या टोळीसकट तिला ताब्यात घेतलं. पोलिसांनी मिनाक्षीला फोन नंबरवरून शोधलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

मीनाक्षीने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे. तिला एका लग्नासाठी दहा हजार रुपये मिळतात. मीनाक्षीने आतापर्यंत राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमधील अनेक ठिकाणी खोटी लग्न केल्याची माहिती दिली. तिने 8 महिन्यांत 6 लग्नं केली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!