नवी दिल्ली: देशात शनिवारी जगातल्या सर्वात मोठ्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला शुभारंभ झाला. काल एका दिवसात देशभरातील एक लाख 91 हजार 181 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली. पहिल्या दिवशी करण्यात आलेल्या लसीकरणामध्ये कोणतेही गंभीर दुष्परिणाम समोर आले नाहीत. एकीकडे सगळं जग भारताच्या लसीकरणाच्या या कार्यक्रमाचे कौतुक करत असताना देशात मात्र यावरुन राजकारण तापण्याची चिन्हं आहेत.
मंत्र्यांनी का नाही घेतली लस, विरोधी पक्षांचा प्रश्न
देशातील लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात तीन कोटी लोकांना ही लस देण्यात येणार आहे. त्यामध्ये कोरोना योध्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचंही सरकारनं स्पष्ट केलंय. त्याचवेळी यावरुन राजकारणाला सुरुवात झाल्याचं समोर येतंय. लसीकरणाच्या या कार्यक्रमावर काँग्रेसने काही प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर समाजवादी पक्षानेही काँग्रेसचा सूर ओढत केंद्र सरकारवर टीका केली. काँग्रेस नेता मनिष तिवारी यांनी या लसीकरणाच्या कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित करताना सरकारला विचारले की, “ही लस सुरक्षित आहे तर सरकारच्या मंत्र्यांनी का घेतली नाही?”
मनिष तिवारी म्हणाले की, “ज्या-ज्या देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे त्या-त्या ठिकाणच्या प्रमुखांनी सर्वप्रथम ती लस घेतल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये एक सकारात्मक संदेश पोहचला. इंग्लंडमध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही सर्वप्रथम लस घेतली. त्यामुळे ती लस सुरक्षित असल्याचा संदेश नागरिकांपर्यंत गेला आहे.”
मनिष तिवारी पुढे म्हणाले की, “इतर सर्व देशातही हीच पार पाडण्यात आली. आपल्या देशात हे चित्र पहायला मिळाले नाही. यावरुन एक प्रश्न पडतो की ही लस इतकी सुरक्षित आहे तर केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी का घेतली नाही? असं झालं असतं तर नागरिकांमध्ये एक संदेश गेला असता.