पुणे । इंग्लंड देशात करोनाने कहर केला असून त्याठिकाणी दुसरी लाट आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. दुसऱ्या लाटेत आलेला करोना विषाणू अधिक प्रभावशाली असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी इंग्लंड येथे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. दरम्यान इतर देशांनी काळजी घेण्यास सुरुवात केली असून ब्रिटनच्या वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत. अशातच पुणेकरांची चिंता वाढवणारी एक माहिती समोर आली आहे.
ब्रिटनहून आलेल्या ५४२ पैकी १०९ प्रवाशांसोबत अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. या प्रवाशांनी दिलेल्या पत्ता आणि फोन क्रमांकावर संपर्क होत नसल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. अनेकांचे फोन बंद असून काही जण दिलेल्या पत्यावर नाही आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुणे पोलिसांना ही माहिती दिली आहे. सध्या पोलिसांसमोर या १०९ जणांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान आहे.
“ब्रिटन किंवा युरोपातील देशांमधून २५ नोव्हेबंरनंतर आलेल्यांचं पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, आणि पुणे ग्रामीण अशी क्षेत्रांप्रमाणे वेगवेगळी वर्गवारी करण्यात आली. ३०० जणांची यादी आपल्याकडे आहे. २७० जणांचे आरटीपीसीआरदेखील करण्यात आले आहेत. पण काही नावांचा खुलासा होत नाही आहे. महापालिकेने यासंबंधी पोलिसांकडे पत्र सोपवलं असून तक्रार दिली आहे,” अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलधीर मोहोळ यांनी दिली आहे.