नागपूर : केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू मुंबईच्या दिशेने निघालेले असताना त्यांना नागपुरात रोखण्यात आलं होतं. त्यानंतर सुमारे दोन ते अडीच तासांनी बच्चू कडू आंदोलनासाठी मुंबईत जाण्यासाठी निघाले. “शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाण्यासाठी परवानगी दिल्याने मी सरकारचे आभार मानतो,” अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळी निघताना दिली.
कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या विविध सीमांवर चार आठवड्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील जिओ ऑफिसवर धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय ते बिकेसीमधील अंबानी, अदानीच्या कार्यालयावर हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना तसंच राज्यातील शेतकरी सामील होणार आहेत.