मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार नवनवे नियम घालून देत आहे किंवा त्यात परिस्थिती अनुरूप बदल देखील केले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक संभ्रमात पडत आहेत. याच मुद्द्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे.
एकीकडे राज्य सरकार कोकणात जाणाऱ्यांना दहा दिवसाचा क्वारंटाईन नियम लागू केला आहे आणि दुसरीकडे त्याच चाकरमान्यांना मुंबईत परतण्यासाठी 14 दिवसाचा क्वारंटाईन नियम लावत आहे. ह्या सरकारचं डोकं सरकलय की काय, असं टीकास्त्र त्यांनी राज्य सरकारवर सोडलं आहे.
कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना राज्य सरकारनं क्वारन्टाईन कालावधीत सवलत दिली होती. 14 दिवसांवरून तो कालावधी 10 दिवसांवर आणला होता. मात्र त्याच चाकरमान्यांना मुंबईत परतण्यासाठी 14 दिवसाचा क्वारंटाईन नियम मुंबई महापालिकेने लावला आहे.
ज्या त्या भागातली परिस्थिती पाहून तिथल्या जिल्हा प्रशासनाने कोरोनासंबंधातली नियमावली तसंच लॉकडाऊन संबंधातील नियम आखावेत, असं राज्य सरकारने सांगितलं आहे. परंतू महाराष्ट्रातल्या अनेक भागांतली परिस्थिती वेगवेगळी असल्याने नियम देखील बदलत आहेत. याचाच त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत असल्याचं एकंदर चित्र आहे.