योगींच्या मंत्र्यांकडून शिवसेनेला प्रत्यूत्तर ‘हीच शिवसेनेची संस्कृती’,

लखनऊ : उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री एस एन सिंह यांनी शिवसेनेला प्रत्यूत्तर देताना, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची झोप उडवल्याचं म्हटलंय. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात उत्तर प्रदेशात उभारण्यात येणाऱ्या फिल्म सिटीवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निशाण्यावर घेण्यात आल्यानंतर भाजपकडूनही पलटवार करण्यात आलाय.

हे वाचा : शेतकऱ्यांनी सरकार समोर ठेवल्या या अटी

‘उत्तर प्रदेशात सुरक्षित वातावरण’

मुंबईत आमचं बॉलीवूडकडून खुल्या दिलानं स्वागत करण्यात आलं. आम्ही आधुनिक फिल्म सिटी उभारत आहोत. उत्तर प्रदेशात सुरक्षित वातावरण असल्यानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली गुंतवणूकदार इकडे येऊ इच्छित आहेत, असा दावाही सिंह यांनी यावेळी केला.

‘शिवसेनेनं दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापूर्वी बॉलिवूडसोबत आपलं नातं सुधारायला हवं’ असा सल्ला सेनेला देतानाच ‘फिल्म सिटी कायम ठेवायची असेल, तर त्यांनी जरूर ठेवावी. कुणीही ती हिसकावून घेत नाही. ही खुली स्पर्धा आहे’ अशी टिप्पणीही सिंह यांनी केली.

‘हीच शिवसेनेची संस्कृती’

‘सामना’च्या माध्यमातून शिवसेनेकडून आक्षेपार्ह भाषेचा वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘अशा आक्षेपार्ह भाषेचा वापर निंदनीय असून हीच शिवसेनेची संस्कृती असू शकते’, अशी जहरी टीकाही सिंह यांनी केलीय.

‘सामना’च्या अग्रलेखात टीका

‘भाजपच्या एका नटीने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्याच मुंबईत येऊन भाजपचे एक मुख्यमंत्री उद्योगपतींशी व कलावंतांशी चर्चा करतात. आपल्या राज्यातील प्रस्तावित फिल्मसिटीबाबत सल्ला घेतात. हा काळाने भाजपवर उगवलेला सूड आहे,’ अशी बोचरी टीका शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर करण्यात आली.

‘उत्तर प्रदेश हे मोठे राज्य असूनही ते फक्त लोकसंख्येनेच फुगले आहे. जातीयता, धर्मांधता यातून निर्माण होणारा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देशाला भेडसावीत आहे. उद्योग नाही म्हणून बेरोजगारी आहे. त्या सर्व श्रमिकांचे, बेरोजगारांचे लोंढे मुंबईसारख्या शहरांवर आदळत आहेत. लखनौ, कानपूर, मेरठ अशा शहरांतील कलाकार, संगीतकार, लेखक वगैरे मंडळी करीअर करण्यासाठी वर्षानुवर्षे मुंबईतच येत आहेत. योगी या सगळ्यांनाच आपल्यासोबत घेऊन जाणार का?’ असा बोचरा सवालही सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलाय.

error: Content is protected !!