अंबाजोगाई : शहरात बनावट नोटांचे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय, शहरातील स्वाराती रुग्णालयाच्या परिसरात दोन तरुण कारमध्ये बसून बनावट नोटा शहरात वटविण्याच्या उद्देशाने खरेदी करत असल्याची गुप्त माहिती अंबाजोगाई शहर पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करून बनावट नोटा आणि कारसह एका तरुणास ताब्यात घेतले. यावेळी त्याचा साथीदार पलायन करण्यात यशस्वी झाला. ही कारवाई सोमवारी (दि.१६) रात्री करण्यात आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून बनावट नोटांच्या कथित रॅकेटची पाळेमुळे कुठवर पसरलेली आहेत याचा पोलीस कसून तपास करत आहेत.